Skip to main content

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २

टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला.

घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता.
मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली.
ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली.
काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जंगलसंवर्धन करू लागला.
टोपीवाल्याची वाढती प्रसिद्धि इतर विक्रेत्यांना मात्र खुपत होती. येन केन प्रकारेण त्यांना हे चित्र बदलायचे होते अन् ती माया हस्तगत करायची होती.
त्यातच एक दुसरा टोपीविक्या होता. ‘बारा’ गावचं पाणी पिऊन आलेला,हुशार पण तरीही ‘मती’भ्रष्ट झालेला.त्याने सर्व पाहणी केली. माकडांना लोभविण्याचे अनेक मार्ग फुकट चालले होते. जशी वाईट वृत्तीची माणसे असतात तशीच झाडावरदेखील खट्याळ माकडे असणारच!
बस्स! त्यांना शोधायचे अन् कामाला लागायचे. मग ह्याने ती खट्याळ माकडे शोधली, त्यांना पहिले पाहिजे ते अन् नंतर नको ते पुरवायला सुरूवात केली. पोट भरले तरी दुसर्याचे कसे ओरबाडायचे, अपचन झाले तरी त्यातून मिळणारा आसूरी आनंद कसा घ्यायचा हे शिकविले.

माकडेच ती अनुकरण करण्यात हुशार! का करायचे, का शिकायचे याचा पाचपोच नव्हताच त्यांना.लवकरच ती तरबेज झाली ह्या सगळ्यात.

बस्स! आता त्याचे काम संपले होते. आता फक्त त्यांना ‘छु’ म्हणायचे बाकी होते.तसे केले त्याने!

हि माकडे परत झाडावर गेली आणि त्यांनी त्यांचे काम सुरू केले.काळ्या तोंडाच्या माकडाने आपल्यासारखीच २-४ माकडे जमवली. इतर माकडे कशी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात,जाणून बुजून त्यांना कमी खाऊ देतात हे दाखविण्याचा मारा चालू केला.
दुसरीकडे लाल तोंडाचे माकड त्याच्यासारख्या २-४ माकडांना घेवून बसले. आपण शरीराने दणकट आणि म्हणून झाडावरच्या इतर माकडांचे रक्षण करतो. झाडावरचा आणि माणसाने आणून दिलेला जास्त खाऊ आपणच घ्यायचा हे बिंबवले.
पांढर्या आणि गुलाबी तोंडाच्या माकडाने त्याच्यासारख्या काही माकडांना फितवले.
काही जाणकार, वृद्ध माकडांनी हा डाव ओळखला. झाडावरच्या तरूण माकडांना समजावयाचा प्रयत्न केला पण हाय! काही फारसा उपयोग झाला नाही.

दोन दिवसांनी पहिला टोपीविक्या आपल्या बरोबर नेहमीची टोपीची बॅग आणि खाऊ घेऊन आला.त्याला पाहताच सगळी माकडे जोरजोरात चित्कार करू लागली. त्याच्याकडे पाहून दात विचकारू लागली.टोपीवाल्याला हे नवीन होते, अनपेक्षित होते. त्याने माकडांना समजावयाचा प्रयत्न केला. पण त्याने ती जास्तीच बिथरायला लागली.
 त्याने जरा शांत असलेल्या जाणकार माकडांना प्रेमाने खाऊ द्यायचा प्रयत्न केला जेणेकरून इतर माकडे त्यांच्याप्रमाणेच शांतपणे घेतील खाऊ! पण घडले उलटेच. बंडखोर माकडे आता ह्या शांत माकडांना त्रास देऊ लागली.
काही माकडे खाऊ ओरबाडायला लागली, त्यामुळे बाकीची माकडे चिडून भांडण करू लागली, एकमेकांना ओरबाडू लागली,फांद्या मारू लागली, कित्येक माकडे जखमी झाली, कित्येकांचा झाडावरून पडून कपाळमोक्ष झाला. काही माकडे त्या टोपीविक्याच्या अंगावर धावली. त्याला चावे घेतले. त्याच्या टोप्या फाडल्या.
ह्या रणधुमाळीत त्या झाडाचा मात्र पूर्णपणे नाश झाला. ते ओकेबोके झाले.
झाड उघडे पडले.दुसरा टोपीविक्या आला. आपली पूर्ण शक्ती गमावलेल्या, गलितगात्र झालेल्या माकडांना पायानेच दूर करून तो झाडापाशी गेला. होती नव्हती ती माया त्याने गोळा केली अन् दुसर्या झाडाच्या शोधार्थ बाहेर पडला.
ते झाड आता कोणालाच फारसा आधार देऊ शकणार नव्हते.
त्या झाडावर एक चिमणी बसली होती. तिने त्यातल्याच एका माकडाला विचारले की  तुम्ही त्या पहिल्या टोपीविक्याचे प्रेम गमावलेत,आपले रहाते घर गमावलेत, साठवलेले गुप्तधन गमावलेत,एकमेकांची मैत्री, विश्वास गमावलात आणि ज्या खाऊसाठी भांडलात त्याचा कणही तुम्हाला नाही मिळाला. ह्या सगळ्यांच्या बदल्यात तुमच्या पदरी काय राहिले?
माकडांकडे काहीच उत्तर नव्हते.

पहिला टोपीविक्या खिन्न मनाने घरी चालला होता, पण तरीही उद्या परत खाऊ घेऊन यायचा, पुन्हा एकदा या झाडाला , त्यावरच्या प्राण्यांना हसतं करायचे हा एक विचार घेऊनच!

तळटिप:
या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.यांचा
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकिय परिस्थितीशी काहीही संबंध नाही आणि जर काही संबंध आढळून
आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा😜😜

@अनघा पारखी

Comments

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...