Skip to main content

माझा गणपती बाप्पा

गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया

आज दणाणून गेलाय साराच परिसर या गर्जनेने.
ढोल, ताशांच्या गजराने आसमंत व्यापून टाकलंय.
घरांघरांतील बाप्पा, सार्वजनिक मंडळातील श्रींच्या मुर्ती.. नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त बाप्पा!

हा बाप्पा मला नेहमीच फार वेगवेगळ्या रुपांत दिसलाय.

‘लोणावळ्याचा आमच्या घरचा बाप्पा’ मला माझ्या मोठ्या भावासारखा वाटतो, जो माझ्यावर माया करतो, माझे लाड करतो. मी चुकले तर दटावतोही.कधी कधी आम्ही भांडलोसुद्धा आहोत. पण तरीही तो अन् मी फार लाडके आहोत एकमेकांचे.

नारायण पेठेतला, माझ्या सासरचा बाप्पा मात्र एकदम वडिलधारी माणूस वाटतो मला.त्याच्याविषयी प्रेम तर आहेच खुप पण त्याच बरोबरीने थोडा आदरयुक्त धाकदेखील आहे.कदाचित कधीकधी मी मनमोकळेपणानं बोलायला धजत नाही पण आश्चर्य म्हणजे त्याला माझ्या मनातले सगळं समजतं.

भांगरवाडी गणपती मंदिर उत्सवाचा बाप्पा म्हणजे माझा जिवाभावाचा मित्र वाटतो मला.खुप खेळलोय आम्ही, मज्जा केलीय, गुपिते share केली आहेत.

दरवर्षी गणेश चतुर्थीला आम्ही सगळे गणपती आणायला निघालो की हमखास दर्शन घडते ते हमालवाड्यातून निघणार्‍या ‘कसबा गणपतीचे’. अनभिषिक्त राजा! हि एकच व्याख्या त्याला लागू होते.पालखीत विराजमान झालेला हा बाप्पा जणू आपल्या नगरीचा फेरफटका मारून जनतेच्या समस्या दूर करणार असेच वाटते.

त्याचवेळी मंडईचा शारदा गजानन हा म्हणजे आपल्या सखीशी हितगुज करणारा, तिच्या जाणीवा समजून घेणार्‍या पतीप्रमाणे वाटतो.

दगडुशेठ हलवाई गणपती म्हणजे  नगर संरक्षक अधिकारीच! संपूर्ण पुण्याची जबाबदारी घेतलेली दिसते त्याने.

आमच्या सृष्टीतला बाप्पा म्हणजे सई जुईंच्या वयाचा त्यांचा दोस्त वाटतो. वाटतं,पटकन येईल अन् म्हणेल की मावशी, सई जुई येणारेत का खेळायला?

बाप्पाची हि प्रत्येक रूपं हवीहवीशी वाटतात,मनाला भावतात.

पण DJ च्या गोंधळांत बसविलेले काही मंडळांचे बाप्पा मात्र मला  ‘सासरचा जाच निमूटपणे सोसणार्‍या सूनेप्रमाणे भासतात. खुप केविलवाणे अन् एकाकी.ताकद त्यांच्यातही तितकीच आहे,इतर गणेशांसारखी! कोणत्याही क्षणी अन्यायाला प्रत्युत्तर करणारी, त्याविरूद्ध लढू शकणारी!
 मात्र नजर वाट पहांत असते त्या वेळेची,जी ह्यासर्व निरर्थक गोष्टींचा,विचारांचा अचूक वेध घेऊ शकेल.

@अनघा पारखी

Comments

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...