दि लिटल् बाॅल
Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह. त्यांचा नुकताच एक performance पाहिला. ‘दि लिटल् बाॅल’.
एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात. लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो. गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो. एक क्षण असा येतो की आता ‘तो’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही.( आपण हसायला लागतो)
‘तो’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो. हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते. पण तरीही ‘तो’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही. ( आपल्याला अजून हसू येते)
आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते. त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो.
आता माणूस आत अडकलाय, तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये.त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे वाईटही वाटत्येय.
शेवटी तो खुणेने सांगतो की अरे! हसताय काय!आणि आपण अजून जोरात हसतो.
अखेरीस दमून ‘तो’ त्या बाॅलला आपल्यापेक्षा दूर ढकलायचा प्रयत्न करायला लागतो,पूर्णशक्तीनिशी!आणि लक्षात येते की बाॅल पुन्हा पहिल्याइतकाच छोटा झालाय.तो हातातला बाॅल खाली ठेवून देतो अन् पळून जातो.
इतकी छोटीशी कथा पण Carlos त्याच्या अभिनय क्षमतेने आपल्याला खिळवून ठेवतो. कोणतीही physical (प्रत्यक्ष) वस्तू न वापरता स्टेजवर बाॅल असण्याचा भास हा ‘ भास’ रहात नाही.
पाहतांना विचार आला की आपले आयुष्य असेच असते नाही! बरेचदा अनेक प्राॅब्लेमस् (आजकालच्या भाषेत Stress)आपले नसतातच मुळी. केवळ आपण ते ओढवून घेतो. त्यांना कुरवाळू लागतो.सुरूवातीला मजा म्हणून आलेले हे पाहुणे आता आपल्याला डोईजड होतात मात्र तरीही आपण त्यांना धरुन ठेवतो. काहीतरी मोठ्ठे नुकसान होईल या भीतीने.पण अखेरीस आपण त्यात इतके गुंततो आणि आत आत अडकत जातो.हे सगळे घडत असताना आजूबाजूची माणसे केवळ प्रेक्षक असतात. आपल्या तगमगीला पाहून हसणारी, प्रसंगी चुकचुकणारी!
खरंतर गरज असते फक्त मनापासून ,सर्वशक्तीनिशी आपण स्वतःच त्या stress रूपी बाॅलला दूर ढकलण्याची,सोडून देण्याची! बस्स मग तो ‘लिटल् बाॅल’आपले काही बिघडवू शकत नाही!
@अनघा पारखी
Comments
Post a Comment