Skip to main content

त्रिवेणी

# late post

त्रिवेणी.....

काही दिवस खास असतात, आवर्जुन आपण celebrate पण करतो.
पण असेही कधी होते की एखादी घटना, एखादा दिवस काळाच्या ओघात विस्मृतीत जातो.आणि एक दिवस अचानक वीज चमकावी तश्या त्या स्मृती चाळवतात.
आज १२ जुलै ... बरोबर ४० वर्षांपूर्वी आम्हा कुलकर्णींच्या घरात एक छोटेखानी समारंभ पार पडला होता.आमच्या ‘त्रिवेणी’ बंगल्याची वास्तुशांत...
एखाद्या गोष्टीशी आपली नाळ जुळते म्हणतात ना तसं झालं असावं माझ्याबाबतीत.
अरविंद अन् अर्चनाने नवीन घरात आज शुभारंभ केला होता अन् त्यांच्याही नकळत त्यांच्या आयुष्यात एका छोट्या जीवाचे आगमन होऊ घातले होते, एक छोटासा अंकुर अर्चनाच्या उदरात स्थानापन्न होत होता...... ते म्हणजे साक्षात अस्मादिक😀
तेव्हापासून त्रिवेणी बंगला आणि मी.. आमचे कधीही न तुटणारे नाते जुळले...
या घराने तब्बल १२ वर्षे अनघाचे सर्व टप्पे पाहिले. छोट्याश्या अनघाचे स्वागत त्याने केले, तिला अक्षरश: अंगाखांद्यावर खेळविले.
त्या घराचा प्रत्येक कानाकोपरा पराग, अनघा आणि जानुच्या मनांत आजही घर करुन आहे.

ते छोटेसे लाकडी फाटक.. हिरव्या रंगाचे, त्यांवर उभे राहून आत यायचे हा शिरस्ता. फाटकांत एक तोरणाचे झाड, त्यावर कधी तोरणे टिकायची नाहीत. ती कधीच आम्हा मुलांच्या पोटात गेलेली असायची. समोर बंगल्यापर्यंत जायला एक पायवाट, ज्याच्या दोन्ही बाजुंना विटा लावलेल्या होत्या. जिथे ही पायवाट संपायची तिथे एक शेणाने सारवलेले अंगण होते.कितीतरी रात्री आम्ही या अंगणात चटईवर झोपून निरभ्र आकाशातल्या चांदण्या पाहिल्या आहेत, नक्षत्रांची ओळख करून घेतलीय.

घराच्या दोन दारांमधील जागेत आमचे permanent खडूने काढलेले stumps होते. दिवस दिवस इथे आम्ही cricket खेळायचो.

अंगणासमोर एका पारावर उभा होता माझा जीवलग मित्र...जांभळाचा प्रचंड वृक्ष. त्याचा सडा संपूर्ण अंगणात पडून अंगण जांभळा शालू पांघरायचे.त्या जांभळांसारखी चव आज विकत घेतलेल्या एकाही जांभळाला येत नाही.आमच्या इथल्या प्रत्येकाने याचा भरभरून आस्वाद नक्कीच घेतलाय.त्या पारावर दिवाळीचे किल्ले करायचो,बसून गप्पा मारायचो.

जांभळाशेजारी एक लाकडी झोका होता, त्यांवर संपूर्ण आळीतील पोरे बसून कल्ला करायचो, तसेच कित्येकदा एकटेच बसून स्वत:शीच संवाद साधायचो.

अंगणाच्या एका बाजूला एक फार सुंदर जास्वंदीचे झाड होते, त्याचा डोक्यावर एक घुमट तयार व्हायचा. त्याच्या सावलीत बसून खाल्लेले दाण्याचा कूट अन् साखर,फुटाणे अन् गुळ केवळ अप्रतिम!

तिथे बाजूलाच एक  पेरूचे झाड होते, आई हाक मारायची तेव्हा अनेकदा आमचा मुक्काम त्या झाडावर असायचा!
अंगणाची कुंपणाजवळील बाजू विविध फुलझाडांनी भरलेली होती,आमचे दादा( आजोबा) पहाटेपासून ९:३०-१० पर्यंत या झाडांना पाणी घालायचे, मागचे पुढचे सगळे अंगण झाडायचे.मागील अंगणात केळीची अन् अजुन काही पेरूची झाडे होती. आमच्या आईने तर तिथे छोटेसे खळे करून तिथे भात अन् सुरण लावलेले देखीलआठवते मला.

तिथे पाणी साठवायची एक टाकी होती ज्याला एका बाजूला एक नळ होता, ही टाकी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी माझी अन् परागची हुकुमाचा एक्का होती. रंगाचे पाणी तयार करायला!
तिथे शेजारी पाणी तापवण्याचा बंब अन् एक छोटी चुलही होती.
त्या घराचे अंगणच नाही तर घराचा कोपरा अन् कोपरा अजुनही तोंडपाठ आहे!
आमच्या बाहेरच्या खोलीतील शहाबादी फरश्या, ज्यात मधला एकच पट्टा तपकिरी रंगाचा होता.
स्वयंपाक घरातील जाळीचे कपाट, मधल्या खोलीतील भिंतीतले कपाट, मधली खोली अन् झोपायची खोली ह्यामधील ती अर्धीच भिंत, बेडरूमच्या दरवाज्याला असलेली ती छोटीशी फट, ज्यातून कोण आलंय कोण गेलंय  ते पहायचो आम्ही.तो जीर्ण झालेला वर्हांडा, त्यामधील ते अस्ताव्यस्त पडलेले सामान, त्याच्या कोपर्‍यामध्ये असलेले white गुलाबाचे झाड.
किती लिहू, काय लिहू! अजूनही त्या बंगल्यातले आमचे आवाज कानात घुमत आहेत.
ते घर माझ्या श्वासांत बसलंय म्हणून तर त्या पूर्ण घराचा एकही फोटो नसताना मी इतके बारकावे लिहू शकत्येय ..आज इतक्या वर्षांनी.

ते घर सतत गजबजलेले होते, माणसांनी!
संपूर्ण आळीतील पोरांचा मुक्काम आमच्या अंगणात असायचा रोज.नातेवाईक इथे यायची निरनिराळी कारणे शोधायचे! आजुबाजूच्या काकू वाळवणं करायच्या या अंगणात!हळदीकुंकू,भोंडला असे अनेक कार्यक्रम व्हायचे इथे!

काळाच्या ओघात म्हणा किंवा परिस्थिती म्हणा पण या घराची अन् आमची सोबत केवळ १२ वर्षांची होती.
त्रिवेणी बंगला जाऊन तिथे आजची “श्री रेसिडेन्सी” ची इमारत उभी राहिली.
आज १२ जुलै ... हे सर्व आठवले... अगदी आजी, दादा, त्यावेळचे आई, पप्पा अन् छोटे पराग, अनघा अन् जानू सहित...
त्या बंगल्यातील प्रत्येक गोष्टीने, झाडांनी, फुलांनी जपलं आम्हाला, खेळवले आम्हाला.प्रेम दिले,भरभरून द्यायला शिकवले.

आत्ताही डोळ्यांसमोर दिसत्येय ती स्वयंपाक घरातील एक पाटी:
“घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती”

आपण गमतीने म्हणतो भिंतींना कान असतात, पण माझ्या या घराला कान, नाक, डोळेच काय पण जीव होता, मन होते.... घट्ट मिठीत घेणारे अन् पाठीवर आपलेपणाने फिरणारे दोन हात होते.

अनघा पारखी

Comments

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...