Skip to main content

सामान्य व्यक्तींमधील वल्ली जगासमोर आणणारा खेळीया

सामान्य व्यक्तींमधील वल्ली जगासमोर आणणारा खेळीया

(स्थळ: स्वर्गातील एक दालन,सर्वत्र सनईचे मंगलसूर ऐकू येत आहेत..देव गंधर्व आणि अप्सरादी मंडळी सुरेख शृंगार करून, उंची अत्तर लावून तयार होत आहेत. तेवढ्यात एक छोट्या चणीचे, तब्येतीने किरकोळ, डोळ्यांमध्ये निळसर झाक,डोक्यास टक्कल असे आजोबा थोड्या घाईतच येताना दिसतात)
अंतू बर्वा: ( अनुनासिक स्वर) अरे शिंच्या! नारायणा ! कुठे उलथला आहेस रे! सकाळी लवकर येणार होतास ना रे ? अरे नारोबा....
नारायण: ( आत कोणालातरी उद्देशून)ते साडीचे पाहतो मी.. पेशवाईमध्येच आॅर्डर दिलीय...अहो म्हणजे काय? भाईंची अर्धांगिनीचा मान नको का त्यांना!
(अंतूंना पाहून) अहो तुमच्याकडेच यायला निघालो होतो.

अं.ब: तू कसला येतोस वेळेत..१०० कामे एकट्याच्या उरावर घ्यायला सांगितलन् कुणी?द्यायचे एखादे काम इतरांना! क्काय?तो गटण्या कुठे उलथलाय? की बापाप्रमाणे प्रुफं तपासत बसलाय?
बरं बोलावणी गेली ना प्रत्येकाला?सूत्र संचालनाचं कोण बघतंय आणि?

नारायण: अहो,चितळे मास्तर! म्हणाले, “ज्याला हातात लेखणी धरायला शिकवले,त्याने त्याच लेखणीने अजरामर केले मला. मग त्याच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभाच्या कार्यक्रमासाठी जंगी सूत्रसंचालन करतो.”

अंतूशेठ,सख्याने .. म्हणजे गटणेने हो,त्याने तर पूर्ण हाॅल भाईंच्या प्रत्येक बुकातील अगदी बेश्ट अशा वाक्यांनी भरून टाकलाय.तुम्हाला सांगतो, तो मला
म्हणाला,”नारोपंत, सरांनी लिहिलेला प्रत्येक शब्द लाखमोलाचा आहे, त्यातील ठळक गोष्टी निवडणे म्हणजे ढिगभर तांदळाच्या राशीतून ठराविक असा तांदळाचा दाणा शोधून काढण्यासारखे आहे”

अं.ब:तो गंप्या पण स्वत: त्या नाम्या परटाबरोबर फिरून पडेल ती कामं करतोय शिंचा! अन् बापू काण्या, नेहमीसारखाच सेक्रेट्री.हॅं हॅं हॅं! स्वागतगीतासाठी मी आपल्या मंजू फुलराणीला सांगितलंय बरे का?
(तेवढ्यात समोरून एक पारशी बाबा येतात)

नारायण: अरे १००% पेस्तन काका? कसं क्काय बरंय ना?

पेस्तन काका: अरे साला तुमी लोग.. मी तुमच्या संगट वार्ता नाय करते.. अरे तो लखू रिसबूड, लै भला माणंस, तेनी मला बोल्ला की भाईंच्या birth century year चा starting program छे, म्हनूनश्यान मी आलो पडत पडत ...नायतर,तूमी साला मला विसरलेला!अरे पन ते भाई कुठे? ए साला, मी त्याला पयले wish करनार!

चितळे मास्तर: (आत येत येत)अरे भाई कुठेच नाहीये! सगळीकडे पाहिले आम्ही. शेवटी नंदा प्रधान गेलाय त्याची गाडी घेउन..तो बघ , तो आलाच!अरे कुठंय पुलं?

नंदा: एक मिनिट .... भाई इथे कुठेच नाहिये..

सगळे: मग?? कुठेत?

नंदा: पृथ्वीवर... अहो, ज्याने आपल्यासारख्या सामान्य माणसांना स्वत:च्या लेखणीचा परिसस्पर्श दिला,आपल्याला अजरामर केले, जो आयुष्यभर सामान्यातले असामान्यपण शोधून जगासमोर आणत राहिला, तो आजही तिथेच आहे.

सगळे: म्हणजे नक्की कुठे?

नंदा: तिथे ..जिथे मराठी माणूस आहे, जिथे मराठी भाषा आहे, जिथे साहित्याबद्दल प्रेम, आपुलकी आहे, जिथे अजुनही लहान मुलांना बालगीत शिकवताना ‘ नाच रे मोरा आंब्याच्या वनांत’ चा नंबर प्रथम लागतो ... भाई या सर्व ठिकाणी आहे.या जन्मशताब्दी वर्षाकरताच नव्हे तर जो पर्यंत मराठी भाषा आहे तोवर आपले महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्व त्या मराठी मनांतच असणार आहे, नांदणार आहे.

मी: भाई, आम्हाला माहित्येय की तुम्ही इथेच आहात आमच्यात.तुमच्या जन्मशताब्दी वर्षाकरीता हार्दिक शुभेच्छा!🙏🙏

@अनघा पारखी

Comments

Popular posts from this blog

दि लिटल बाॅल

दि लिटल् बाॅल Carlos Martinez हे नाव म्हणजे theatre क्षेत्रातील ‘Miming’ चा बादशाह . त्यांचा नुकताच एक performance पाहिला . ‘ दि लिटल् बाॅल ’. एका माणसाला एक छोटा बाॅल सापडतो रस्त्यात . लहान मुलाप्रमाणे तो त्याच्याशी खेळायला लागतो . गंमत म्हणजे बाॅल एका हातातून दुसर्‍या हातात जाताना हळूहळू आकाराने मोठा होत जातो . एक क्षण असा येतो की आता ‘ तो ’ त्या बाॅलला हातात धरू शकत नाही .( आपण हसायला लागतो ) ‘ तो ’ त्या बाॅलला जमीनीवर ठेवून खेळणे सुरू ठेवतो . हळूहळू बाॅल इतका मोठ्ठा होतो की त्याच्याशी खेळणे कठीण होते . पण तरीही ‘ तो ’ त्या बाॅलला हात लावणे सोडत नाही . ( आपल्याला अजून हसू येते ) आता त्या बाॅलची ताकद वाढलेली असते . त्याच्या त्या वाढलेल्या ताकदीने तो बाॅल त्या माणसाला आत खेचून घेतो .  आता माणूस आत अडकलाय , तो आतून आवाज द्यायचा प्रयत्न करतोय पण आवाज बाहेर ऐकू येत नाहीये . त्याची धडपड पाहून आपण आपले हसू थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला जरासे ...

हृदयात वाजे समथिंग.....

हृदयात वाजे समथिंग..... सई: आई, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना? मी: हो. सई: मग तु काय करणार? मी: काही नाही, सकाळी उठून माझ्या व्हॅलेंटाईनला गवारीची भाजी आणि पोळीचा डबा देणार, भांडी घासणार,घर आवरणार... सई: ए काय गं आई! किती बोअरिंग...काहीतरी वेगळं... मस्त करा ना. मी: ( मनांत) आता काय वेगळं आणि मस्त करणार बाई!हम्म, गेले ते दिवस आणि तसे दिवस आले तरी कधी होते म्हणा, असो, मी: (उघडपणे) मस्त म्हणजे???? सई: (लबाडपणे हसत)अगं मस्त म्हणजे कळलं नाही तुला? मी: (मनांत) बापरे! हिला कधी कळायला लागलं सगळं, आजकालची लहान मुलं म्हणजे ना,जाम स्मार्ट झाली आहेत, मोबाईल इंटरनेटमुळे सगळं फार लवकर कळते त्यांना! मी: ( उघडपणे जरा ओरडूनच) काय नाही कळाले??  आणि तुला काय करायचे गं व्हॅलेंटाईन वगैरे, लहान आहेस अजुन. आणि हो, ते व्हॅलेंटाईन सोड आता, अभ्यासाला लागा, परिक्षा जवळ आलीय आता. नस्त्या उठाठेवी करू नका! चल आता जा! सई: (बाहेर जाऊन जुईला म्हणाली) आईला ना काही कळत नाही. कित्ती ओरडते अंगावर उगीचच. आता उद्या काहीतरी मस्त कर म्हणाले तर मला काय ओरडली. जुई....पिझ्झा किंवा बर्गर मागायला काही दुसरी , अजुन ...

टोपीवाला आणि माकडे- पार्ट २

टोपीवाला आणि माकडे -पार्ट २ टोपीवाल्याने झाडाच्या इतरत्र पडलेल्या सर्व टोप्या आणि टोप्यांच्या बाजूला पडलेली माया ( जी या माकडांनी वाटसरूंकडून लुटलेली), माकडांनी खाली फेकलेली फळे उचलली आणि गावाकडे चालू लागला. घरी गेल्यावर त्याला समजले की अरेच्चा! आपल्या जेवढ्या टोप्या माकडांनी घेतल्या होत्या, त्यापेक्षा जास्त टोप्या मिळाल्या परत. असे कसे काय ब्वा??थोडा शोध घेतल्यावर  त्याला समजले की हा तर त्या माकडांचा खेळ आहे, खाऊच्या आशेने बरीचशी माया या माकडांनी जमा केलीय. खाण्याच्या पदार्थांव्यतिरीक्त त्या माकडांना कशातच interest नव्हता. मग ह्या टोपीवाल्याने extra मिळालेल्या टोप्या गावातील गरजूंना दिल्या, मिळालेल्या मायेमधून त्याने झाडाजवळ पाण्याची विहीर बांधली.नवीन झाडे लावली.एवढे करून तो त्या माकडांना नाही विसरला, त्यांच्यासाठी नित्यनेमाने खाऊ नेऊ लागला.साहजिकच माकडांची वाटसरूंच्या सामानावर डल्ला मारायची सवय सुटायला लागली. ती माकडे आता ह्या टोपीवाल्याला आपला मानू लागली. काही माकडे झाडावर साठवलेली माया स्वत:हून टोपीविक्याला देऊ लागली. जे वापरून तो टोपीविक्या नवनवीन झाडे लावायला लागला.जं...